कोटा : राजस्थानातल्या कोटा येथील जे के लोन रुग्णालयात दोन दिवसांत १० अर्भके दगावली आहेत. त्यापैकी सहा अर्भके २३ डिसेंबर व चार अर्भके २४ डिसेंबर रोजी मरण पावली. त्यामुळे राज्यात खळबळ माजली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाने दिले आहेत. दोन दिवसांत दहा अर्भकांचा मृत्यू होणे, ही मोठी घटना वाटत असली तरी ही नित्याची बाब नव्हे, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. मरण पावलेल्यांमध्ये पाच मुले व पाच मुलींचा समावेश आहे.
जे के लोन रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एच. एल. मीना म्हणाले आहे की, अर्भकांची प्रकृती अतिशय गंभीर झाल्यानंतरच त्यांना खाजगी रुग्णालये, सरकारी आरोग्य केंद्रातून जे के लोन रुग्णालयामध्ये उपचारांसाठी पाठविले जाते. अशापैकी रोज एक ते तीन अर्भकांचा उपचारादरम्यान मृत्यू होत असतो. कधीकधी एकाचाही मृत्यू होत नाही. या रुग्णालयामध्ये अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला गेल्या काही वर्षांत यश आले आहे. गुदमरल्याचा परिणामदोन दिवसांत दहा अर्भके दगावल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी जे के लोन रुग्णालयाने बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अमृतलाल बैरवा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समिती नेमली आहे. डॉ. बैरवा यांनी सांगितले की, दोन दिवसांत जी १0 अर्भके मरण पावली, त्यातील पाचपैकी तीन बालके जन्माला येताना श्वास घेण्यातल्या अडचणीमुळे अपुऱ्या प्राणवायूअभावी गुदमरली होती. उरलेल्या दोन अर्भकांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग झालेला होता.