भोपाळ : भारतीय हवाई दलाच्या ९१व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी भोपाळमध्ये ‘भव्य एअर शो’चे आयोजन करण्यात आले. भोपाळमधील बडा तलावस्थित बोट क्लबवर हा एअर शो झाला. जलाशयावर झालेला हा देशातील पहिला सर्वांत मोठा एअर शो ठरला. या एअर शोमध्ये हवाई दलाच्या विमानांनी विविध प्रकारच्या हवाई कसरती करून दाखवल्या.
तुफान गर्दी अन् मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
हा रोमांचकारी एअर शो पाहण्यासाठी व्हीआयपी रोड, वन विहार इथपासून ते राजा भोज सेतूपर्यंत दर्शकांनी गर्दी केली होती. घरे आणि हॉटेलांच्या छतांवरही लोकांची गर्दी दिसत होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि त्यांच्या पत्नी साधना सिंग हेसुद्धा एअर शो पाहण्यासाठी आले होते. एअर शोला एवढी गर्दी झाली होती की, शो संपल्यानंतर या परिसरात वाहतूक कोंडी झाली.
गजराज फॉर्मेशनमध्ये रिफ्युएलिंग विमान आयएल-७८ने दोन एम-२००० विमानांत हवेतल्या हवेत इंधन भरले.
पृथ्वी फॉर्मेशनमध्ये सी-१३० जे सुपर हर्क्युलिस, एएन-३२ विमानांनी हवाई कसरती दाखविल्या.
एमआय-१७ व्ही-५ हेलिकॉप्टरांच्या आकाशगंगा पथकातील १० सदस्यांनी ८ हजार फूट उंचीवरून पॅराशूटच्या सहाय्याने बड्या तलावात स्काय डायव्हिंग केले.
मनुआभान टेकडीवरून दोन चिनूक हेलिकॉप्टरांनी उड्डाण करताच ४ चेतक हेलिकॉप्टरांनी ध्वज फॉर्मेशन केले.