उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (Uttar Pradesh Assembly Elections) कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. त्यांच्या गाडीवर तीन-चार राऊंड फायर झाले. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनीच ट्वीट करून गाडीवर गोळीबार झाल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एमआयएमच्या मुंबईच्या सेक्रेटरी झोहरा खान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज शेअर केलं आहे.
या व्हिडीओमध्ये एक लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला व्यक्ती टोल नाक्यावरुन जात असलेल्या ओवेसी यांच्या गाडीकडे धावत जाताना दिसत आहे. तसंच या व्हिडीओमध्ये हल्लेखोर त्यांच्या गाडीवर फायरिंग करुन पळण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत दिसत आहे. परंतु त्यातला एक हल्लेखोर गाडीवर आदळून खाली पडताना दिसतोय. यादरम्यान एक हल्लेखोर आपल्या हातात बंदूक घेऊन फायरिंग करतानाही दिसत आहे. दरम्यान, यानंतर हापुडचे एसपी दीपक भुकर यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे.