नवी दिल्ली - Narendra Modi interview ( Marathi News ) एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे विरोधकांनी सातत्याने भाजपावर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या भूमिकांना विरोध करत शिंदेंनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना पक्षाच्या ४० हून अधिक आमदारांनी पाठिंबा दिला. तर अजित पवारांनीही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसोबत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एकनाथ शिंदे-अजित पवार हे भाजपासोबत का आले याचा खुलासा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमत समुहाला विशेष मुलाखत दिली. लोकमत समुहाचे सह व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी पंतप्रधानांना अनेक मुद्द्यावर प्रश्न विचारले. त्यावेळी नरेंद्र मोदींनीही दिलखुलास उत्तरे दिली.
या मुलाखतीत मोदींना विचारण्यात आलं की, राजकारण वेगळे आणि कुटुंब वेगळे. आपण मोठे आहात. अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे पवार कुटुंब तुटेल याचा आपल्याला अंदाज नव्हता का? भाजपसोबत येण्यासाठी शरद पवार यांच्याशी कधी चर्चा झाली होती का? असा प्रश्न केला.
त्यावर शरद पवार हे अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबात जे काही झाले त्याचे उत्तर तेच देऊ शकतात. मात्र, राष्ट्र प्रथम आणि विकासावर आधारित राजकारण ज्यांना करायचे आहे त्यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे कायमच खुले आहेत. अजित पवार असोत किंवा एकनाथ शिंदे; ते एनडीएमध्ये आले याचे कारण म्हणजे, विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला ते कंटाळले होते. आपला देश आता योग्य मार्गाने विकास करत असल्याची त्यांची खात्री झाल्यामुळेच ते आमच्यासोबत आले असं मोदींनी उत्तर दिलं.
त्यासोबतच मला शरद पवार यांचे आश्चर्य वाटते. ते म्हणतात की, भविष्यात लहान पक्षांनी काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावे. यातून बारामतीच्या निवडणुकीचे काही संकेत मिळत आहेत का ? की, ज्या पद्धतीने संपूर्ण राज्य मतदान करत आहे ते पाहून त्यांना नैराश्य आले आहे का? नाही तर, ज्या शरद पवारांनी काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला, तेच शरद पवार आता पुन्हा त्याच काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भाषा का करत आहेत ? हा मलाच पडलेला प्रश्न आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी इथे क्लिक करा