नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलच्या अंदाजावरुन देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील नागरिकांनी विश्वास ठेऊन भाजपाला मतदान केल्याचं सांगण्यात सांगण्यात येतं. मात्र सोमवारी नागपुरात आरएसएसचे नेते भैय्याजी जोशी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर नव्या चर्चेला उधाण आलेलं आहे.
एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर आरएसएस नेते आणि नितीन गडकरी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या भूमिकेवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील सरकारमध्ये नितीन गडकरी यांची भूमिका काय असेल याबाबत या बैठकीत चर्चा झाली. नितीन गडकरी हे आरएसएसच्या जवळचे नेते आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा देशात एनडीए सत्तेत आल्यानंतर गडकरी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतील. जवळपास 2 तास चाललेल्या या बैठकीत भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी सरकारी योजनांवर चर्चा झाल्याचं सांगितले.
नितीन गडकरी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या पोस्टर्सचे अनावरण करताना माध्यमांशी संवाद साधला यामध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, एक्झिट पोलचे निर्णय अंतिम नसतात मात्र संकेत असतात. भाजपा बहुमत पार करेल आणि पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी दिला आहे.
एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येईल असं चित्र असलं तरी पक्षाकडून प्लॅन बी आखण्यात आला आहे. या प्लॅन अंतर्गत भाजपाकडून शक्य तितक्या घटकपक्षांशी चर्चा करण्यात येणार आहे. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात भाजपा आघाडीसाठी प्रयत्न करतेय. तेलुगू राज्य तेलंगणा आणि आंध्र प्रदेश याठिकाणी दोन असे पक्ष आहेत ज्यांनी अद्याप ठोस भूमिका घेतली नाही. केंद्रात सत्ता स्थापनेवेळी हे दोन पक्ष यूपीए असो वा एनडीए कोणाच्या बाजूने मतदान करतील हे आता सांगता येणार नाही. टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव आणि वायएसआरचे प्रमुख जनमोहन रेड्डी यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केली नाही.
देशाच्या राजकारणात तिसरी आघाडी कठीण प्रसंगात होते आणि अशी आघाडी झालीच तर ती जास्त दिवस टिकत नाही हा इतिहास आहे. जर भाजपा 300 आकडा पार करु शकली नाही तर अशा परिस्थितीत अन्य पक्षांच्या मदतीची भाजपाला गरज पडेल. सध्याच्या सर्व्हेनुसार यूपी, बिहार, महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाजपाला किती जागा मिळतात याकडे पक्षाचे लक्ष आहे. कारण यूपीमध्ये 80, महाराष्ट्रात 48, बिहारमध्ये 40, पश्चिम बंगाल 42 अशा एकूण जागा 210 जागांवर भाजपाच्या सत्तेची गणिते अवलंबून आहेत. या राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपाला विश्वास आहे. जर या राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही तर अन्य पक्षाचा पाठिंबा भाजपाला घ्यावा लागेल. त्याचसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एनडीएच्या नेत्यांना डिनरसाठी दिल्लीत आमंत्रित केलं आहे. या डिनरमधून भाजपा निकालानंतरची रणनीती आखण्याची तयारी आहे.