नवी दिल्ली - लडकी हूँ लड सकती हूँ म्हणत यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक संपूर्ण शक्तिनिशी लढवण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रेस पक्ष लढताना दिसलाच नाही. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमधूनही काँग्रेसला हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतपत जागा देण्यात आल्या आहेत. त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रियंका गांधी यांनी मोठं विधान केलं आहे.
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला दिलेल्या किरकोळ जागांबाबत प्रियंका गांधी म्हणाल्या की, आम्ही बऱ्याच वर्षांनंतर उत्तर प्रदेशात ४०० जागांवर निवडणूक लढवली आहे. आता निकाल काय येतात ते पाहू. मात्र यावेळी काँग्रेसने खूप मेहनत घेतली आहे. जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत किती जागा मिळतील याबाबत काही सांगता येणार नाही.
दरम्यान, इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ४०३ पेकी २८८-३२६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला ७१ ते १०१ जागा मिळू शकतात. बहुजन समाज पक्षाला ३ ते ९ जागा मिळू शकतात तर इतरांना ३ ते ६ जागा मिळू शकतात. याच एक्झिट पोलने उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ १ ते ३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे.
उत्तर प्रदेशात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशमध्ये ठाण मांडले होते. त्यांनी सर्व सूत्रे हातात घेत राज्यात ४० टक्के तिकिटे महिलांना दिली होती. तसेच लडकी हूँ लड सकती हूँ अशी घोषणा देत योगी आदित्यनाथ यांना आव्हान दिले होते.