मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 02:44 PM2024-06-02T14:44:11+5:302024-06-02T14:53:19+5:30

Lok Sabha Election 2024 Manoj Tiwari And Kanhaiya Kumar : मनोज तिवारी की कन्हैया कुमार... या जागेवर कोण निवडणूक जिंकणार? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या जागेवर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही या दोघांमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला होता.

exit poll 2024 who win Lok Sabha Election from north east delhi seats Manoj Tiwari or Kanhaiya Kumar | मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा

मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा

दिल्लीच्या सात जागांवर मतदान झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल २०२४ चे निकालही समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजामुळे दिल्लीतील काही जागांवर सस्पेंस वाढला आहे. विशेषत: ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघात, एक्झिट पोलमुळे निकालाची चर्चा पूर्वीपेक्षा अधिक रंगली आहे. 

मनोज तिवारी की कन्हैया कुमार... या जागेवर कोण निवडणूक जिंकणार? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या जागेवर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही या दोघांमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला होता. एक्झिट पोल समोर आल्यानंतर असं मानलं जात आहे की, कन्हैया कुमार यांचा जोरदार लढत देऊनही निवडणुकीत पराभव होऊ शकतो. पण हे दाव्यासह म्हणता येणार नाही.

एबीपी सी व्होटर एक्झिट पोलने दिल्लीत भाजपाचं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला आहे. सी व्होटर पोलनुसार, एनडीएला दिल्लीत ५१ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे, इंडिया आघाडीला ४६ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे आणि इतरांना ३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीतील ७ जागांपैकी एनडीए ४ ते ६ जागा जिंकू शकते आणि इंडिया आघाडी १ ते ३ जागा जिंकू शकते.

इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला ५४ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे तर इंडिया आघाडीला ४४ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. ॲक्सिस माय इंडियाने भाजपाला सहा ते सात जागा आणि इंडिया आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

दिल्लीतील सात जागांपैकी एकमेव जागा ईशान्य दिल्लीत आहे, जिथे भाजपाने विद्यमान खासदार मनोज तिवारी यांना तिकीट दिलं आहे. तर या जागेवर मुस्लिमांची लोकसंख्या सहा लाखांहून अधिक आहे. या प्रदेशातील दहा विधानसभेच्या बहुतांश जागा आम आदमी पक्षाच्या आमदारांनी जिंकल्या आहेत. दिल्लीतील सात जागांपैकी या जागेवर सर्वाधिक मतदान झालं आहे. जनता आता ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर संभाव्य निकालाची वाट पाहत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी यांनी या जागेवरून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. भाजपा नेते मनोज तिवारी यांना ७,८७,७९९ मतं मिळाली. तर शीला दीक्षित यांना ४,२१,६९७ मतं मिळाली. आम आदमी पक्षानेही या जागेवर दिलीप पांडे यांना उमेदवारी दिली होती, त्यांना १९०८४६ मतं मिळाली होती.
 

Web Title: exit poll 2024 who win Lok Sabha Election from north east delhi seats Manoj Tiwari or Kanhaiya Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.