नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांचे मतदान संपताच वेगवेगळ्या चॅनेलनी काही यंत्रणांसोबत मिळून केलेले एक्झिट पोल जाहीर केले होते. यामध्ये दोन्ही राज्यांमध्ये पुन्हा भाजपाचेच सरकार येणार असल्याचे म्हटले होते. मात्र, हरियाणामध्ये मतदानानंतर केलेल्या एका सर्व्हेमध्ये भाजपाला धक्का बसण्याचे संकेत आहेत.
आजतक हा हिंदी न्यूज चॅनल आणि अॅक्सिस माय इंडिया यांनी केलेल्या या सर्व्हेमध्ये भाजपाला बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. सर्व्हेमध्ये सत्ताधारी भाजपाला अधिकाधिक 44 जागा मिळू शकतात तर कमीतकमी 32 जागा मिळू शकतात. ही संख्या बहुमतापेक्षा खूपच कमी आहे. या सर्व्हेनुसार काँग्रेसला 30 ते 42 जागा मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तर जेजेपीला 6 ते 10 आणि इतरांना 6 ते 10 जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे.
2014 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला 47 जागा मिळाल्या होत्या. बहुमत मिळाल्याने सरकार बनविले होते. विभाजनाचे इनेलोला मोठे नुकसान होऊ शकते. 2014 मध्ये इनेलोला 19 जागा मिळाल्या होत्या. सोमवारी दाखविलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 75 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
सर्व्हेमध्ये भाजपाला 33 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 32 टक्के आणि जेजेपीला 14 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. आज तकच्या सर्व्हेनुसार हरियाणामध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते.
अन्य सर्व्हेंमध्ये भाजपाला पसंती एबीपी आणि सीव्होटरनुसार भाजपाला 72 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला केवळ 8 आणि अन्य 10 जागा वर्तविण्यात आल्या आहेत. न्यूज-24 नुसार भाजपाला 71 जागा मिळू शकतात. रिपब्लिक चॅनेलनुसार भाजपाला 52 ते 63 जागा दाखविण्यात आल्या आहेत.