नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपालाकाँग्रेसकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. टाइम्स नाऊ - सीएनएक्स आणि एबीपी न्यूज-लोकनीतीने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजपा सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र रिपब्लिक आणि सीवोटर, न्यूज नेशन यांनी केलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात भाजपाचा पराभव होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टाइम्स नाऊ - सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये भाजपाला 46, काँग्रेसला 35, बसपा आघाडीला 7 आणि इतरांना दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एबीपी न्यूज-लोकनीती CSDSच्या एक्झिट पोलमध्येही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपाला 52 जागा मिळतील, तर काँग्रेसला केवळ 35 जागांवर समाधान मानावे लागेल. तर अन्य पक्षांना केवळ 3 जागा मिळतील.मात्र न्यूज नेशनने केलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजपाचा पराभव होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपाला 38 ते 42, काँग्रेसला 40 ते 44 तर जेसीसी-बसपा आघाडीला 4 ते आणि इतरांना 0 ते 4 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रिपब्लिक आणि सी वोटरच्या एक्झिट पोलमध्येही छत्तीसगडमधून भाजपाच्या पराभवाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेमध्ये राज्यात भाजपाला 35 ते 43 तर काँग्रेसल 40 ते 50 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.