नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी एवघा एक दिवस शिल्लक आहे. निवडणुकीसंदर्भात आलेल्या एक्झिट पोलनुसार एनडीएला बहुमत मिळणार आहे. एक्झिट पोलमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. तर सत्ताधारी भाजपच्या गोटात आनंदोत्सव सुरू झाला आहे. मात्र एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आलेल्या निकालांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. तसेच अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी एक्झिट पोलचा वापर सुरू असल्याची शक्यता विविध पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे.
एक्झिट पोलमुळे विरोधकांच्या मोर्चेबांधणीची गती मंदावली आहे. विरोधक संभ्रमात आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल एक्झिट पोलच्या विपरीत लागल्यास विरोधकांना हालचालींना वेळ मिळणार नाही. तर एक्झिट पोलच्या आडून इतर गोष्टी साध्य करण्याची उठाठेव सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारकडून इव्हीएममध्ये काही तरी घोळ करण्यात येणार आहे. त्यासाठी एक्झिट पोलच्या माध्यमातून तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर २२ विरोधी पक्षांनी प्रत्येक विधानसभा मतदार संघात ५० टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मागणी केली आहे.
तसेच शेअर मार्केटसाठी देखील एक्झिट पोलचा पर्याय शोधण्यात आला असेल, असा दावा करण्यात येत आहे. एक्झिट पोल आल्यानंतर शेअर बाजाराने अचानक मुसंडी मारली. त्यामुळे एक्झिट पोलचा वापर शेअर मार्केटमधून पैसा काढण्यासाठी करण्यात येत असल्याचा दावा विरोधक करत आहेत. तर अनेकांनी एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांना मॅनेज केल्याचा दावा केला आहे. पैशांच्या मोबदल्यात एक्झिट पोलचा निकाल बदलल्याचा संशय व्यक्त होत आहे.