Exit poll Jharkhand 2024: झारखंडमध्ये फुलणार कमळ? ४ एक्झिट पोल्समध्ये बहुमताचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 10:35 AM2024-11-21T10:35:51+5:302024-11-21T10:37:53+5:30
Jharkhand Election 2024 Exit Poll: झामुमो आघाडीची सत्ता जाणार असल्याचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.
नवी दिल्ली : झारखंडच्या विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांचे मतदान झाल्यानंतर विविध एक्झिट पोल्समध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला बहुमत प्राप्त होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, एका एक्झिट पोलमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्त्वाखालील इंडिया आघाडी सरकारला झारखंडच्या जनतेने पुन्हा कौल दिल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
झारखंडमध्ये ७ एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैक ५ एक्झिट पोलमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा अंदाज आहे. तर इंडिया आघाडीचे सरकार पुन्हा स्थापन होईल, असा अंदाज २ एक्झिट पोल्सनी व्यक्त केला आहे. एनडीएला सरासरी ४० जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर इंडिया आघाडीला सरासरी ३८ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे.
दुसऱ्या टप्प्यात ६८ टक्के मतदान
रांची : झारखंड विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यात ३८ जागांसाठी बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ६८ टक्के मतदान झाले. मतदान शांततेत पार पडले.
जामतारा जिल्ह्यात ७६.१६ टक्के सर्वाधिक मतदान झाले. तर पाकूडमध्ये ७५.८८ टक्के, देवघरमध्ये ७२.४६ टक्के, रांचीमध्ये ७२.०१ टक्के मतदान झाले. बोकारो जिल्ह्यात सर्वांत कमी ६०.९७ टक्के मतदान झाले.
महेशपूर विधानसभा मतदारसंघात ७९.४ टक्के सर्वाधिक मतदान झाले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या बरहाइट मतदारसंघात ६६.०३ टक्के मतदान झाले.
पोटनिवडणुकीत सुमारे ५५ टक्के मतदान
नवी दिल्ली : चार राज्यांत विधानसभेच्या १५ जागांसाठी झालेल्या पाेटनिवडणुकीत बुधवारी सुमारे सरासरी ५५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
उत्तर प्रदेशात दगडफेकीची एक घटना वगळता इतरत्र ही पाेटनिवडणूक शांततेत पार पडली. उत्तर प्रदेशातील ९, पंजाब -४, उत्तराखंड-१ आणि केरळमधील एका विधानसभा जागेसाठी हे मतदान झाले.