नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे एक्झिट पोल आल्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. एक्झिट पोलमध्ये एनडीए बहुमताचे आकडे गाठेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र या एक्झिट पोलच्या आकडेवारीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी अनेक एक्झिट पोलमधून काँग्रेसचा पराभव होईल असं वर्तविण्यात आलं होतं असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागला याचे परिणाम सगळ्यांनी पाहिले. तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी एक्झिट पोलला एक्झॅट पोल मानायला नकार दिला आहे.
काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, ज्याप्रकारे एक्झिट पोलमध्ये आकडेवारी दाखविण्यात आली आहे तशी शक्यता फार कमी आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विट करत 2004 मध्ये एक्झिट पोल दाखविले होते. 2018 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निकालांचे एक्झिट पोल दाखविले होते. त्यात काँग्रेसचा पराभव होईल सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात निकाल उलट लागले होते. त्यामुळे 23 मे पर्यंत वाट पाहावी असा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रत्यक्ष निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होईल आणि भाजपाच्या आश्वासनाचा बुरखा फाटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच काँग्रेसचे संघटन प्रभारी उपाध्यक्ष चंद्रप्रभाष शेखर यांचे म्हणणं आहे की, मध्य प्रदेशात काँग्रेस 22 जागा जिंकेल. एक्झिट पोलमधून जी आकडेवारी येतेय ती चुकीची ठरेल. जनमाणसात लोकांची मते काँग्रेसला आहेत. त्यामुळे 23 मे रोजी येणारे प्रत्यक्ष निकाल हे एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची ठरविणारे असतील असं सांगितले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवला आहे. इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून प्रत्येक राज्यात जनतेमध्ये भाजप आणि काँग्रेसबद्दल काय वातावरण हे समोर आलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणात जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य प्रदेशातल्या 29 जागांपैकी भाजपाला 26-28 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसला 1 ते 3 जागा मिळण्याचा कयास आहे.