EXIT POLL: लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या, म्हणजेच 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. तत्पुर्वी एक्झिट पोलमधून बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वातील NDA ला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रा' आणि 'भारत न्याय यात्रे'चे एक्झिट पोल समोर आले आहेत. यात्रेचा काँग्रेसला किती फायदा झाला, हे यातून स्पष्ट होत आहे.
हा एक्झिट पोल TV9, पीपल्स इनसाइट आणि पोलस्ट्रॅटचा आहे. एक्झिट पोलनुसार, राहुल गांधींनी केलेल्या दोन यात्रेत लोकसभेच्या 154 जागा कव्हर केल्या, त्यापैकी इंडिया आघाडी 47 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. म्हणजेच इंडिया आघाडीला एक तृतीयांशपेक्षा कमी जागा मिळत आहेत, तर एनडीएच्या खात्यात 103 जागा जाऊ शकतात.
भारत जोडो यात्राराहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 पर्यंत चालली. या काळात राहुल यांनी काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास केला होता. या दौऱ्यात राहुल गांधी 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशात गेले. राहुल यांनी भेट दिलेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. यामध्ये त्यांनी 64 मतदारसंघ कव्हर केले. पण, एक्झिट पोलनुसार, यातील केवळ 24 जागांवर इंडिया आघाडीला विजय मिळताना दिसत आहे. तर, एनडीएच्या खात्यात 38 जागा येत आहेत.
भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी ते 17 मार्च 2024 पर्यंत चालली. या दुसऱ्या यात्रेत 15 राज्ये, 110 जिल्हे आणि 90 लोकसभेच्या जागांचा समावेश करण्यात आला होता. मणिपूरपासून सुरू झालेला हा प्रवास मुंबईत संपला. या काळात राहुल यांनी मणिपूर, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांचा दौरा केला. एक्झिट पोलनुसार, यापैकी इंडिया आघाडीच्या खात्यात 23 जागा जात आहेत, तर एनडीए 65 जागांवर विजय मिळवताना दिसत आहे.