चंदिगढ: महाराष्ट्रासोबत हरयाणातही विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. महाराष्ट्रात महायुतीला मोठा जनादेश मिळताना दिसत असला तरी हरयाणात भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियानं केलेल्या सर्वेक्षणातून भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी लढत दिसत आहे. त्यामुळे हरयाणात सत्ता स्थापनेसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळू शकते. हरयाणात विधानसभेचे 90 मतदारसंघ आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी 46 जागांची आवश्यकता असते. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपाला 32 ते 44, तर काँग्रेसला 30 ते 42 जागा मिळू शकतात. काल मतदान झाल्यानंतर जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी भाजपाला प्रचंड बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला हरयाणात केवळ 15 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाला 47 जागांवर यश मिळालं होतं.हरयाणात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतो. राज्यात काँग्रेस, भाजपामध्ये सत्तेसाठी जोरदार चुरस असताना दुश्यंत चौटाला यांच्या जेजेपीला 6 ते 10 मिळू शकतात. इतर पक्षांनादेखील 6 ते 10 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाचा अंदाज खरा ठरल्यास 24 ऑक्टोबरला मतमोजणी झाल्यावर हरयाणात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळू शकतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 47 जागा मिळाल्या होत्या. यानंतर 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं राज्यातील सर्वच्या सर्व 10 जागा जिंकल्या. यावेळी राज्यातील 79 विधानसभा मतदारसंघात भाजपानं आघाडी मिळवली. मात्र आता हे चित्र बदलताना दिसत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 15 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ 10 विधानसभा मतदारसंघात आघाडी राखता आली.
Exit Poll: भाजपाला बहुमताची हुलकावणी; हरयाणा विधानसभेत 'जेजेपी' ठरणार 'किंगमेकर'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 7:49 PM