Exit Poll Result 2022 : "उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये आम्ही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 08:46 PM2022-03-07T20:46:40+5:302022-03-07T21:04:41+5:30
Exit Poll Result 2022 And Nitin Raut : काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील एक्झिट पोलचा फोटो शेअर करत मोठा दावा केला आहे.
मुंबई - उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसंदर्भात एबीपी सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला धक्का बसणार आहे आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. गोव्यात आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेसची एंट्री झाल्यानं काँग्रेसला फटका बसेल आणि त्याचा फायदा भाजपला होईल, असं म्हटलं जातं. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील एक्झिट पोलचा फोटो शेअर करत मोठा दावा केला आहे.
नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "एक एक्झिट पोल असा होता. जेव्हा निकाल लागला तेव्हा भाजपाला केवळ 77 जागा मिळाल्या. उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये आम्ही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार. नेते आणि पक्ष कार्यकर्ते इमानदारीने मतमोजणीच्या कामात लागले आहेत" असं नितीन राऊत यांनी केलं आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार येईल, असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवला आहे. इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाबमधील काँग्रस सरकारला मोठा धक्का बसताना दिसत आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा करिश्मा पंजाबमध्ये पाहायला मिळत आहे.
एक एक्जिट पोल ये था। जब नतीजे आए तो बीजेपी को मात्र 77 सीटें मिली।
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) March 7, 2022
उत्तराखंड-पंजाब-गोवा और मणिपुर में हम सरकार पूर्ण बहुमत से सरकार बनाएंगे।
नेता और पार्टी कार्यकर्ता ईमानदारी से काउंटिंग करवाने में लग जाएं। #ExitPollpic.twitter.com/bPPgHsELD3
दोन मुख्यमंत्री बदलूनही भाजपाला उत्तराखंडात धक्का; काँग्रसचं कमबॅक; पाहा कोणाला किती जागा?
उत्तराखंडमध्ये एबीपी सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 26 ते 32, काँग्रेसला 32 ते 38, आपला 0 ते 2 आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उत्तराखंडच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढत झाली. भाजपाला 41 टक्के मतं मिळत आहेत. तर दुसरीकडे, काँग्रेसला 39 टक्के आहे. याशिवाय 'आप'च्या खात्यात 9 टक्के आणि इतरांच्या खात्यात 11 टक्के मतं अपेक्षित आहेत. उत्तराखंडची निवडणूक भाजपासाठी सर्वात आव्हानात्मक आहे. कारण येथे गेल्या दोन दशकांपासून दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा आहे. अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. पण काँग्रेसला टक्कर देत भाजप सत्ता परिवर्तनाची परंपरा मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करेल.
गोव्यात खेला होबे? ना काँग्रेस, ना भाजप; 'या' लहान पक्षाकडे सत्तेच्या चाव्या
गोव्यात काँग्रेस, भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्यामुळे लहान पक्षांना मोठा भाव येऊ शकतो. गोव्यात सर्वाधिक मतं भाजपला मिळतील, असं आज तक- ऍक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतो. भाजपला ३३ टक्के मतं मिळू शकतात. तर काँग्रेसला त्याखालोखाल ३२ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवण्यात काँग्रेस पुढे आहे. काँग्रेसला १५ ते २० जागा, तर भाजपला १४ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागा आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी २१ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेस पहिल्या, भाजप दुसऱ्या स्थानावर राहण्याचा अंदाज आहे. विधानसभेत त्रिशंकू स्थिती राहिल्यास महाराष्ट्र गोमांतकवादी पक्ष खेला करू शकतो. मगोपला १२ टक्के मतांसह २ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. मगोपनं तृणमूल काँग्रेससोबत निवडणूक लढवली होती.