ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारं राज्य अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेसाठी 7 टप्प्यांमध्ये मतदान पूर्ण झालं असून आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर यायला सुरूवात झाली आहे. टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये 26 वर्षांनी कमळ फुलण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागू शकतं. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता स्थापन होईल अशी आकडेवारी या एक्झिट पोलमध्ये समोर आली आहे.
या एक्झिट पोलमध्ये 403 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 190 ते 210 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुमतासाठी 202 जागा मिळण्याची आवश्यकता असल्याने एक्झिट पोलनुसार भाजपाची एकहाती सत्ता येऊ शकते. एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर उत्तरप्रदेशमध्ये जवळपास 26 वर्षांनी भाजपाची एकहाती सत्ता येईल. टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने जाहिर केलेल्या एक्झीट पोलमध्ये समाजवादी पक्ष - कॉंग्रेसला 110 ते 130 जागा, बहुजन समाज पक्षाला 54 ते 57 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एक नजर इतर Exit Poll वर-
- नेटवर्क- 18 च्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपा 185 जागा मिळवून लर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पक्ष -काँग्रेसला 120 जागा आणि बसपला 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.