ऑनलाइन लोकमतपंजाब, दि. 9 - पंजाबमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज आज तक आणि सीसेरो यांच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. पंजाब राज्य भाजपाच्या हातातून निसटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपा आघाडीला फक्त 4 ते 7 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर अनेक वर्षं सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला 62 ते 71 जागा मिळण्याचा अंदाज आहे. आज तक आणि सीसेरोच्या एक्झिट पोलमुळे काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पंजाब विधानसभेत बहुमतासाठी 59 जागांची गरज लागणार आहे. तर अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला 42 ते 51 जागा मिळण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे इंडिया टीव्ही आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलनं पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. भाजपा + अकाली दल 9, काँग्रेस 45, तर आम आदमी पार्टीला 63 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी एकहाती सत्ता स्थापन करण्याचा अंदाज इंडिया टीव्ही आणि सी व्होटरनं व्यक्त केला आहे. इतर ठिकाणी भाजपा सत्तेवर येणार असले तरी पंजाबमध्ये पुन्हा कमळ फुलण्याची शक्यता धुसर झाली आहे. गेल्या पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अकाली दलानं 56 जागा, तर त्यांचा सहयोगी पक्ष भाजपानं 12 जागा जिंकल्या होत्या. भाजपा आणि अकाली दल यांनी युती करत 68 जागांसह दुस-यांदा सरकार स्थापन केलं होतं. तर 2012मध्ये काँग्रेसला 46 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. मात्र त्यानंतर आता पुन्हा काँग्रेस भाजपाकडून सत्ता खेचून आणण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.
EXIT POLL- पंजाबमध्ये होणार सत्तांतर, काँग्रेस की आप ?
By admin | Published: March 09, 2017 6:05 PM