देशात गेल्या काही दिवसांपासून पाच राज्याच्या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. रविवारी ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, काल पाच राज्यातील निकालांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोलने आता राजकीय पक्षांचा संभ्रम वाढवला आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन मोठ्या राज्या भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत दाखवली आहे. यामुळे आता सर्वांचे लक्ष मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांतील अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या आमदारांकडे असेल. त्यामुळे प्रत्येक पक्ष आमदारांना सांभाळण्याची तयारी करत आहेत.
दुबईत पंतप्रधान मोदींचं जल्लोषात स्वागत; 'भारत माता की जय'च्या घोषणा
काँग्रेसमध्येही तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. यावर काँग्रेसचे नेते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, मी आमदारांना सांभाळायला तयार आहे. पक्षाच्या हाय कमांडने आदेश दिल्यास ते पाच राज्यांतील आमदारांना हाताळण्यास तयार आहे. हायकमांडने विचारले तर मी त्या ५ राज्यातील आमदारांना सांभाळायला तयार आहे, असंही शिवकुमार म्हणाले.
एक्झिट पोलने सर्वच पक्षांचा गोंधळ वाढवला. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होऊ शकते, असे एक्झिट पोल दाखवले आहे, तर दोन्ही राज्यांमध्ये सत्ताधारी काँग्रेसची भाजपवर थोडीशी आघाडी आहे. आजपर्यंत, अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपला पूर्ण बहुमत मिळत असल्याचं दिसत असताना, बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये नेट-टू-नेट लढत पाहायला मिळत आहे. अशीच काहीशी परिस्थिती राजस्थानमध्येही पाहायला मिळत आहे. जिथे काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. छत्तीसगडमधील एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचा विजय होत असला तरी बहुतांश पोलमध्ये भाजप आणि काँग्रेसमधील फरक खूपच कमी आहे.
'इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये भाजपला एमपीमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्याचे दिसून आले आहे. मध्यप्रदेशात भाजप १४०-१६२ जागा जिंकू शकतो. तर काँग्रेसला ६८-९० जागा मिळताना दिसत आहेत. शिवराज सरकारवर पुन्हा एकदा जनतेचा विश्वास दिसून येत आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप ६ एक्झिट पोलमध्ये पुढे आहे आणि काँग्रेस तीनमध्ये पुढे आहे. मात्र, जवळपास सर्वच मतदानात दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया आणि टुडेज चाणक्य यांच्या मते, भाजप १३९-१६३ जागांसह सरकार बनवू शकते. तर काँग्रेस ६२-८६ जागांपर्यंत मर्यादित राहू शकते. मध्यप्रदेशात तीन सर्वेक्षण झाले असून त्यात काँग्रेसचे सरकार मध्यप्रदेशात स्थापन होणार आहे.
जन की बात सर्व्हेमध्ये भाजपला १००-१२३ तर काँग्रेसला १०२-१२५ जागा मिळाल्याचं दिसत आहे. पोलस्ट्रेटचे म्हणणे आहे की, भाजपला १०६-११६ जागा मिळतील. तर काँग्रेस १११-१२१ जागांसह मोठा पक्ष होऊ शकतो. सी व्होटरने भाजपला ८८-११२ जागा मिळतील, तर काँग्रेसला ११३-१३७ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.