लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्येच भाजपची सत्ता येईल, अशी शक्यता बहुतांश जनमत चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आली होती. मात्र, भाजपने गोव्यातही बहुमत मिळवून या निष्कर्षांना चकवा दिला. पंजाबमध्ये आपची सत्ता येईल, हा जनमत चाचण्यांचा अंदाज खरा ठरला आहे.
इंडिया टुडे - ॲक्सिस, माय इंडिया, सीएनएन-न्यूज १८, टाईम्स नाऊ-व्हेटो, इंडिया न्यूज आदींनी केलेल्या जनमत चाचण्यांत उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळून तो पक्ष सत्तेवर येईल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. तसेच पी-मार्क, सी-व्होटर आदी संस्थांनी केलेल्या जनमत चाचण्यांत मणिपूरमध्ये भाजपच सत्तेवर येईल, असे सूतोवाच केले होते, तेही खरे ठरले. मात्र, गोव्यात भाजपला १४ ते १८ इतक्याच जागा मिळतील, हे जनमत चाचण्यांनी केलेले भाकीत मात्र चुकीचे ठरले. गोव्यात भाजपने २० जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला ७१ ते १६० जागा मिळतील, असे जनमत चाचण्यांनी म्हटले होते. समाजवादी पक्षाने १२०च्या वर जागा जिंकून हा निष्कर्ष बऱ्याच अंशी खरा ठरवला आहे. पंजाबमध्ये आप पक्षाला ७६ ते ९० इतक्या जागा मिळतील, असा जनमत चाचण्यांचा होरा होता.
जनमत चाचण्यांचे अंदाज चुकूही शकतातपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या संदर्भातील जनमत चाचण्यांचे निष्कर्ष खरे ठरले. याचा अर्थ प्रत्येक वेळेसच तसे होईल, असे समजण्याचे कारण नाही. अनेकदा जनमत चाचण्यांचे निष्कर्ष फसले असल्याच्या वस्तुस्थितीकडे राजकीय निरीक्षकांनी लक्ष वेधले आहे.