त्यामुळे चुकीचे ठरू शकतात लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 09:52 AM2019-05-22T09:52:50+5:302019-05-22T09:54:32+5:30
बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि एनडीएला आघाडी दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात निकालही तसाच लागेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यासाठी आता 24 तासांहून कमी अवधी राहिला आहे. दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधून केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि एनडीएला आघाडी दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात निकालही तसाच लागेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. कारण अनेकदा एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निकाल यात कमालीची तफावत दिसून आलेली आहे. त्यामुळे गुरुवारीसुद्धा प्रत्यक्ष निकाल आणि एक्झिट पोल यांच्यात फरक दिसू शकत.
2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेत पुनरागमन करेल, असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोलनी वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात मतमोजणीनंतर निकाल वेगळेच लागले. 2009 मध्ये सुद्धा एनडीए आणि यूपीएमध्ये अटीतटीची लढाई होण्याची शक्यता एक्झिट पोलनी वर्तवली होती. मात्र यूपीएने एकतर्फी विजय मिळवला होता.
एक्झिट पोल चुकीचे ठरण्याची अनेक कारणे आहेत. एक्झिट पोलचा सर्वे करण्यासाठी फार कमी मतदारांचे मत विचारात घेतले जाते. हे ठरावीक मतदार म्हणजे सर्व मतदारांचे प्रतिनिधी ठरत नाही. एक्झिट पोलसाठी घेतलेल्या मतदारांच्या मताची सॅम्पल साइझ खूप कमी असल्याने काही चूक झाल्यास त्याचा निकालावर मोठा परिणाम होऊ शकतो.
असे एक्झिट पोल पक्षांना मिळणाऱ्या मतांचे प्रमाण जाणून घेण्याच्या दृष्टीने डिझाइन केले जातात. त्यात प्रत्यक्ष किती जागा मिळणार याची चर्चा होत नाही. नंतर हे मतांचे प्रमाण जागांमध्ये परिवर्तीत केले जाते. त्यामुळे जागांचा योग्य अंदाज काढणे कठीण होते. त्यातही जर बहुरंगी लढत असेल तर मतदानाच्या टक्केवारीवरून जागांचा अंदाज लावणे कठीण होते.
एक्झिट पोल चुकीचे ठरल्यास त्याची अनेक कारणे सांगितली जाता. उदाहरणच द्यायचं तर कौल जाणून घेण्यासाठी चुकीच्या मतदारांना मिळालेले प्राधान्य, संबंधित मतदारांनी दिलेली चुकीची उत्तरे, कल जाणून घेण्यासाठी घेतलेल्या नमुन्यात असलेल्या चुका, तसेच सर्वसामान्यांच्या अपेक्षेनुरूप निकाल दाखवण्यासाठी केलेला फेरफार, अशी कारणे एक्झिट पोल चुकीचे ठरल्यानंतर दिले जातात.
दरम्यान, मतमोजणीवेळी प्रथम व्हीव्हीपॅटची मतमोजणी करायची की इव्हीएममधील मतांची मोजणी करायची याचा निर्णय निवडणूक आयोग आज घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही पाच पोलिंग बूथवरील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांजी मोजणी करून त्यांची आकडेवारी जुळवून घेण्यात येणार आहे. मंगळावारी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन प्रथम व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्याची मागणी केली होती.