दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ जानेवारी रोजी मतदान झालं असून, या मतदानानंतर संभाव्य निकालाचा अंदाज वर्तवणारे विविध एक्झिट पोल प्रसिद्ध झाले आहेत. यापैकी बहुतांश एक्झिट पोलमधून दिल्लीत सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, भाजपा दीर्घकाळानंतर दिल्लीची सत्ता मिळवेल, असा दावा करण्यात आला आहे. काही सर्व्हेंमधून दिल्लीत भाजपाला निर्विवाद बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही सर्व्हेंनी भाजपा आणि आपमध्ये अटीतटीची लढत होईल, असा दावा केला आहे. मात्र एक्झिट पोलमधून करण्यात आलेल्या आम आदमी पक्षाच्या पराभवाच्या भाकितानंतर काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांनी एक्झिट पोलच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
संदीप दीक्षित एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, एक्झिट पोलच्या मते दिल्लीमध्ये भाजपाचं सरकार स्थापन होईल. मात्र मला वाटतं की, एक्झिट पोल आम आदमी पक्षाला खूपच कमकुवत समजत आहेत. आम आदमी पक्षाची कामगिरी एवढी खराब होईल, असं वाटत नाही.
संदीप दीक्षित यांनी पुढे सांगितले की, एक्झिट पोलमधून मला जी निराशा झाली आहे, त्याचं कारण म्हणजे काँग्रेसला १७-१८ टक्के मतदान आरामात मिळेल, असं मला वाटत होतं. मात्र आम्ही हे मतदान मिळवू शकलो नाही का, हे मतदान आपल्याकडे वळवण्यात काय उणीव राहिली, हे आपल्याला पाहावे लागेल.
एक्झिट पोल कधी कधी खरे ठरतात, कधी चुकतात. जर तुम्ही केवळ एक्झिट पोलचा संदर्भ घेत असाल, तर जे एक्झिट पोलमधून दाखवलं जातंय, तसं घडेल, असं मला वाटत नाही. यावेळी मतदानाची टक्केवारी चांगली राहिलेली नाही. त्यामुळे निकाल आल्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होणार आहे. ८ तारखेलाच सर्व काही कळेल.