बेंगळुरु : जवळपास महिनाभराच्या राजकीय नाट्यानंतर कुमारस्वामींचे काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यात भाजपाला यश आले होते. यानंतर येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी त्यांना महिना लागला आहे. आज येडीयुराप्पांच्या 17 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमत न मिळाल्याने येडीयुराप्पा यांनी स्वत:ला मुख्यमंत्री घोषित करूनही बहुमत सिद्ध करता आले नव्हते. अखेर काँग्रेस, जेडीएसने आघाडी करत कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता. कुमारस्वामींनी दीड वर्ष रडतखडत सरकार चालविले होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्रास दिला जात होता. यामुळे गेल्याच महिन्यात काँग्रेसचे 12 आणि जेडीएसचे 3 आमदारांनी बंड करून राजीनामे दिले होते.
या बंडखोर आमदारांनी थेट मुंबई गाठली होती. यामुळे त्यांना मनविण्यासाठी काँग्रेसचे नेतेही मुंबईत आले होते. मात्र, असफल झाल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामींनी चालढकल करत विधानसभेत विश्वास प्रस्ताव मांडला होता. यावेळही वेळकाढू धोरण अवलंबत एक आठवडा टोलवाटोलवी केली होती. अखेर बहुमत सिद्ध होत नसल्याचे पाहून कुमारस्वामींनी राजीनामा दिला होता.
आता नव्याने मुख्यमंत्री बनलेल्या भाजपाच्या येडीयुराप्पा यांनी आज मंत्रीमंडळ विस्तार केला आहे. त्यांनाही मंत्रीमंडळ विस्ताराची भीती सतावत होती. अखेर रविवारी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि राज्यपाल विजुभाई वाला यांच्याकडे 17 मंत्र्यांच्या नावाची यादी सोपविली. यामध्ये भाजपाचे काही जुने नेते, येडीयुराप्पांच्या आधीच्या सरकारमध्ये असलेले काही नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे.