राष्ट्रवादी कॉँग्रेस सोडण्यामागील कारण काय?- राजर्षी शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने राजकारण करीत असलेल्या शरद पवारांना गेल्या ४० वर्षांपासून खंबीरपणे साथ दिली. त्यामागे स्वत:चा नाही तर केवळ कष्टकरी, कामगार समाजाचा विकास व्हावा हाच हेतू होता. मात्र प्रत्येक वेळी पवारांनी आपला, आंबेडकरी जनतेचा वापर करून घेतला. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळविण्यासाठी आपण पहिल्यांदा मागणी केली. मात्र त्याला त्यांच्याकडून फारशी साथ मिळाली नाही. तरीही आपण एकट्याने लढा देत जागा मिळविण्यात यशस्वी झालो. प्रत्येक वेळी आपल्याला डावलण्यात येत असल्याचे लक्षात आल्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.आरपीआयचे विविध गट व अन्य पक्ष असताना भाजपामध्ये का प्रवेश केला?- काँग्रेस, राष्ट्रवादी हे भाजपाला जातीयवादी पक्ष म्हणत असले तरी तो सर्व घटकांसाठी काम करणारा पक्ष असल्याचे आपल्याला समजले. जनतेच्या भरभरून प्रतिसादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात अनेक वर्षांनंतर पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन झाले. त्यांच्यामुळे देशात व राज्यात विकास, परिवर्तन घडू शकत असल्याने भाजपामध्ये प्रवेश केला. कसलीही अपेक्षा नसताना पक्षाने आपला मान राखत उमेदवारी दिली. आपल्या प्रचारातील मुद्दे काय आहेत?- दलित, कष्टकरी जनतेच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार असून राष्ट्रवादीने गेल्या १५ वर्षांत अनेक क्षेत्रांत भ्रष्टाचार करून कोट्यवधीचे घोटाळे केले आहेत. सहकार चळवळ मोडीत काढली. ते आपण जनतेसमोर मांडत आहोत. कुर्ला (पू.) मतदारसंघ राखीव असून इथला विकास रखडला आहे. रखडलेले झोपडपट्टीचे पुनर्वसन, एसआरए योजना मार्गी लावताना वाहतुकीची कोंडी दूर करू, खेळासाठी मैदान उपलब्ध करून देऊ.उपरा उमेदवार असल्याची टीका प्रतिस्पर्ध्याकडून होत आहे?- गेली साडेचार दशके आपण मुंबईत राहून कष्टकरी, कामगारांची मोट बांधून कार्यरत राहिलो आहोत. संघटनेच्या माध्यमातून मुंबईसह पूर्ण राज्यातील मतदारसंघात आपले काम चालू आहे. पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने हा फालतू मुद्दा उपस्थित करीत आहेत. विजयी झाल्यानंतर मी या ठिकाणी घर घेऊन राहणार आहे.
जनतेला परिवर्तनाची अपेक्षा
By admin | Published: October 10, 2014 2:57 AM