संतोष ठाकुरनवी दिल्ली : मंदीच्या सावटामुळे रेल्वेही संकटात सापडली असून गर्दीच्या काळात वसूल केले जाणारे १५ टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत १ आॅक्टोबरनंतर निर्णय घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे माल वाहतुकीसाठी आकारला जाणारा ५ टक्के अधिभारही रद्द करण्यात आला आहे. रेल्वेचे सदस्य पी.एस. मिश्रा म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा माल वाहतुकीचे प्रमाण घटले आहे. मात्र, वाहन आणि सिमेंट क्षेत्रातील उलाढालीमुळे या क्षेत्राकडून माल वाहतूक वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे.मिश्रा म्हणाले की, सिमेंट, लोह आणि वाहन क्षेत्राकडून माल वाहतूक वाढेल. अनेक मोठ्या कंपन्यांना माल वाहतुकीसाठी संपर्क साधल्यान आमचा उत्साह वाढला आहे. पुढील काळात कोळसा उत्पादनही वाढणार असल्यामुळे आमचे नुकसान होणार नाही. कोळस खाणींजवळ सध्या पाऊस पडत असल्यामुळे कोळसा वाहतूक यंदा १५ टक्क्यांनी घटली आहे. वाहनांच्या वाहतुकीसाठी विशेष रॅक तयार करण्यात येणार आहेत. हे रॅक विशेषकरून चारचाकी आणि दुचाकींसाठी असतील. आतापर्यंत वाहन क्षेत्रासाठी ८ ते १० रॅक उपलब्ध करून दिले जात होते. मात्र, आता २६ ते ५० पर्यंत रॅक तयार केले जाणार आहेत. हरियाणातील मानेसर, महाराष्ट्रातील पुणे, चेन्नई आणि गुजरात या भागातील माल वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे.
रेल्वेला वाहन, सिमेंट क्षेत्राकडून अपेक्षा; १५ टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 2:29 AM