काँग्रेसचा टोला : मोदी सरकारपुढे अध्यादेश पारित करण्याचे आव्हाननवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयके मार्गी लावण्यासाठी विरोधकांच्या मदतीची आस लावून बसलेल्या मोदी सरकारला शुक्रवारी काँग्रेसकडून चांगलाच ‘दणका’ मिळाला़ संपुआ सरकारच्या कार्यकाळातील धोरणे आणि कार्यक्रम संपुष्टात आणल्यानंतर मोदी सरकार संसदेत काँग्रेसकडून पाठिंब्याची अपेक्षा करीत असेल तर ते विचित्र आहे, असे काँग्रेसने यानिमित्ताने सरकारला सुनावले़काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी गुरुवारी टिष्ट्वटरवरून या आशयाचे टिष्ट्वट के ले़ संपुआची अनेक ध्येयधोरणे, योजना मोडीस काढण्यासाठी टपलेल्या मोदी सरकारने आमच्याकडून पाठिंब्याची अपेक्षा करणे विचित्र आहे, असे टिष्ट्वट त्यांनी केले़अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उणेपुरे तीन दिवस उरले असताना काँग्रेसने दिलेली ही परखड प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात आहे़ वादग्रस्त भू-संपादन कायद्याच्या वटहुकमासह अनेक महत्त्वपूर्ण विधेयके सरकारला या अधिवेशनात पारित करायची आहेत़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी यासंदर्भात अहमद पटेल आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा केल्याचे कळते़ भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) लोकसभेत बहुमत आहे; मात्र राज्यसभेत बहुमत नसल्याने विधेयके संमत करणे सरकारपुढे मोठे आव्हान आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
आमच्याकडून पाठिंब्याची अपेक्षा विचित्र
By admin | Published: February 21, 2015 3:46 AM