नवी दिल्ली : यंदा देशभर चांगला पाऊस होण्याची खूशखबर असल्याने जुलैपासून सुरू होणाऱ्या २०१७-१८ या कृषीवर्षात देशात अन्नधान्याचे २७३ दशलक्ष टन एवढे न भूतो असे उत्पादन होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.आगामी खरीप हंगामातील पेरण्यांचे नियोजन व धोरण याविषयी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग म्हणाले की, मंत्रालयाने तयार केलेल्या दुसऱ्या सुधारित अंदाजानुसार चालू हंगामातही अन्नधान्याचे उत्पादन २७१.९८ दशलक्ष टन एवढी विक्रमी पातळी गाठेल अशी अपेक्षा आहे.मंत्री म्हणाले की, आगामी कृषीवर्षासाठी याहूनही जास्त म्हणजे २७३ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष्य ठरविण्यात आले असून, चांगल्या पावसामुळे हे लक्ष्य गाठणे शक्य व्हावे, असे दिसते.या कार्यक्रमात कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी खरीप हंगामासाठी बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. उदा. भाताचे ८३.४६ लाख क्विंटल तर तुरीचे ३.७५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. या हंगामासाठी २८.८८ दशलक्ष टन रासायनिक खतांची अपेक्षित गरज असून, ही खतेही उपलब्ध आहेत. खरिपाच्या पेरण्या सुरळीत व्हाव्यात यासाठी राज्य सरकारांनी आवश्यक तेवढी दर्जेदार बियाणी व खते वेळेवर उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी, यावर मंत्री सिंग यांनी भर दिला. ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेसह शेतकऱ्यांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनाही राज्यांनी नेटाने राबवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
यंदा अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होण्याची अपेक्षा
By admin | Published: April 26, 2017 12:54 AM