नवी दिल्लीयंदाच्या कृषी उत्पादन मोसमात गहू आणि इतर रबी पिकांचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन होईल अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी रबी हंगामात १५.३२ कोटी टन इतकं उत्पादन झालं होतं. यावेळी त्याहून जास्त उत्पादन होऊन नवा विक्रम प्रस्थापित होईल, असा विश्वास तोमर यांनी व्यक्त केला आहे. २०२०-२१ या कृषी वर्षात केंद्र सरकारने एकूण ३०.१ कोटी टन इतक्या उत्पादनाचं लक्ष्य ठेवलं आहे. यात रबी हंगामातून १५.१६ कोटी टन इतकं उत्पादनाची अपेक्षा आहे.
देशात कृषी क्षेत्राने मागील वर्षात खूप चांगली कामगिरी केली. खरीप हंगामातील उत्पादनाचा नवा विक्रम प्रस्थापित केला गेला. यावेळी रबी हंगामात आम्हाला गेल्या हंगामापेक्षा अधिक उत्पादनाची अपेक्षा आहे, असं तोमर म्हणाले.
शेतकऱ्यांची प्रचंड मेहनत आणि मोदी सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताच्या धोरणामुळे कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल. नव्या कृषी कायद्यांमुळे सर्वच क्षेत्रांना फायदा होईल, असंही तोमर म्हणाले.
रबी हंगाम सध्या सुरू झाला असून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. खरीप हंगामातील उत्पादनांची कापणी झाल्यानंतर पुढे लगेचच रबी हंगामात पेरणीला सुरुवात ऑक्टोबरपासून होते. रबी हंगामात गहू आणि मोहरीचे प्रामुख्याने उत्पादन केले जाते. सरकारी आकड्यांनुसार चालू रबी हंगामात आतापर्यंत गहूच्या पेरणीत यंदा ४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. सध्या देशात ३२५.३५ लाख हेक्टरवर गहूची पेरणी झालेली आहे. तर धान्याच्या उत्पादनात किंचित घट झाली असून १४.८३ लाख हेक्टरवर इतकी आहे. गेल्या वर्षी १५.४७ लाख हेक्टरवर धान्याचे उत्पादन झाले होते. रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रात वाढ होऊन ६२०.७१ लाख हेक्टर इतके झाले आहे.