चेन्नई : कोरोना लॉकडाऊनच्या काळात गरीबांना मदतीचा हात देणाऱ्या तामिळनाडूतील एका सलून मालकाच्या मुलीची संयुक्त राष्ट्रांनी दखल घेतली आहे. ‘यूनायटेड नॅशन्स असोसिएशन फॉर डेव्हलपमेंट अँड पीस’ची (यूएनएडीएपी) ‘गुडविल अॅम्बेसेडर टू द पूअर’ म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आहे. एम. नीथरा असे या मुलीचे नाव आहे. या मुलीच्या वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी जमविलेले ५ लाख रुपये लॉकडाऊनच्या काळात गरीबांना देण्यासाठी तिने आपल्या वडिलांचे मन वळविले. राज्यमंत्री सेलुरु राजू यांनी या मुलीची प्रशंसा केली असून दिवंगत जयललिता यांच्या नावाचा पुरस्कार या मुलीला दिला जावा, अशी विनंती आपण मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्याकडे करणार आहोत, असे ते म्हणाले.काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलीची स्तुती केली होती. ही मुलगी मदुराईचा गौरव आहे असे ते ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हणाले होते. तसेच, या मुलीचे वडील सी. मोहन यांचेही त्यांनी कौतुक केले होते. या मुलीचे वडील मोहन हे मदुराईमध्ये एक सलून चालवितात. त्यांनी जमा केलेली रक्कम या कठीण काळात गरीबांसाठी खर्च केली. नीथरा हिला आता संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क आणि जिनिव्हा येथील संमेलनात बोलण्याची संधी मिळणार आहे.
शिक्षणासाठी जमवलेले ५ लाख रुपये लॉकडाऊनच्या काळात गरिबांसाठी केले खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 5:51 AM