नवी दिल्ली : अनेक दुर्धर आजारावरील औषधी आणि खाद्य सामग्रींना मूलभूत आयात करातून (सीमा शुल्क) पूर्णत: वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. १ एप्रिलपासून हा निर्णय लागू होईल.
वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘राष्ट्रीय दुर्धर आजार धोरण २०२१’ अन्वये सूचीबद्ध असलेल्या सर्व आजारांवरील उपचारासाठी तसेच खाजगी उपयोगासाठी आवश्यक असलेल्या सर्व औषधांवरील सीमा शुल्क हटविण्यात आले आहे. स्पायनल मस्कुलर एट्रॉफी अथवा डूशेन मस्कुलर डिस्ट्रॉफी या आजारावरील उपचारासाठी आवश्यक औषधांवरील सीमा शुल्क आधीच हटविण्यात आले आहे. अन्य दुर्धर आजारांवरील औषधांनाही ही सवलत देण्याची मागणी सरकारकडे हाेत होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यात वेगवेगळ्या कर्करोगावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या पेमब्रोलीजूमाब (केट्रूडा) या औषधाचा समावेश आहे. औषधांवर सुमारे १० टक्के सीमा शुल्क लागते. प्राणरक्षक औषधी व लसींवर सवलतीच्या दराने ५ टक्के सीमा शुल्क लागते. या आजारांवरील औषधी आणि विशेष खाद्य सामग्री खूप महाग असते. तसेच त्यांची आयात करावी लागते. १० किलो वजन असलेल्या बाळावरील काही दुर्मीळ आजारांवरील उपचाराचा वार्षिक खर्च १० लाखांपासून १ कोटी रुपयांपर्यंत आहे. आता ही औषधी स्वस्त होतील.