नवी दिल्ली : देशाला लवकरच दुसरी लस मिळू शकते. भारत बायोटेकने यासाठी अर्ज केला असून, राष्ट्रीय औषध प्राधिकरणाच्या विषय तज्ज्ञ समितीची आज (शनिवार) बैठक आहे. या बैठकीदरम्यान भारत बायोटेकने केलेल्या अर्जावर विचार केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कोरोना संकटातून लवकरात लवकर दिलासा मिळण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अनेक कंपन्या लस शोधत असून, काही कंपन्यांच्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. तर अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांसाठी केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार केल्या जात असलेल्या कोविशिल्ड लसीच्या वापराला आपत्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्डला पॅनलकडून मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली असून, यावर अंतिम निर्णय DCGI घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तत्पूर्वी, कोरोना लसीची ड्राय रन संपूर्ण देशात सुरू करण्यात आली आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत कोरोना लसीची ड्राय रन म्हणजचे रंगीत तालीम करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रनचा आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी फक्त दिल्लीतच नाही, तर देशभरात करोनाची लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगितले. मात्र, काही कालावधीनंतर केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केले.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून फायजर-बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून पहिल्यांदाच एखाद्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मंजुरीनंतर या लसीच्या वापरासाठी जागतिक पातळीवर मार्ग खुला झाला आहे. काही देशांनी फायजर-बायोएनटेकच्या लसीला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. आतापर्यंत ही लस अमेरिका आणि युरोपमध्येच उपलब्ध आहे.