नवी दिल्ली : महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या झाल्याप्रकरणी दाखल प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) व आरोपपत्र सार्वजनिक करण्याचा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने गृहमंत्रालयाला दिला आहे.ओडिशाच्या रहिवासी हेमंत पांडा यांनी गृहमंत्रालयाकडे सात सूत्री अर्ज सादर करताना हत्येचा एफआयआर, आरोपपत्रासह अन्य माहिती मागितली होती. कायद्यानुसार बापूंचे शवविच्छेदन झाले काय? ही माहितीही त्यांनी जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याची दखल घेत पारदर्शकता समितीने उपरोक्त आदेश दिला. गृहमंत्रालयाने हा अर्ज अभिलेखागार, दर्शन समिती, तसेच गांधी स्मृतीच्या संचालकांकडे पाठविला आहे. गांधी स्मृतीला पूर्वी बिर्ला हाऊस संबोधले जायचे. त्याच ठिकाणी गांधींची हत्या झाली. त्यांनी अखेरचे दिवसही तेथेच घालविले होते. सार्वजनिक अहवाल कायदा १९९३ व सार्वजनिक अहवाल नियम १९९७ च्या तरतुदींनुसार आवश्यक माहिती मिळविण्यासाठी कार्यालयात येऊ शकता, असे अभिलेखागाराने पांडे यांना कळविले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
महात्मा गांधींच्या हत्येचा एफआयआर उघड करा
By admin | Published: June 28, 2015 11:45 PM