- नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
आॅनलाईन व्यवहार आणि खरेदीवर ग्राहकांना ‘कॅशबॅक’ आॅफर देणाऱ्या कंपन्यांना आता ग्राहकांना सर्व प्रकारच्या अटींसंदर्भात स्पष्ट माहिती द्यावी लागणार आहे. ‘कॅशबॅक’च्या नावावर फसगतीचे अनेक प्रकार उजेडात आल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने या क्षेत्रातील कंपन्यांना लगाम घालणारे धोरण लागू करण्याचे ठरविले आहे. येत्या काही दिवसांत कॅशबॅक आॅफर देणाऱ्या कंपन्यांना सर्व अटी ग्राहकांना स्पष्ट करण्यासंबंधीचे निर्देश ग्राहक कल्याण मंत्रालयातर्फे जारी केले जातील. यात व्यवहाराआधीच ग्राहकांना कॅशबॅकसंदर्भात सर्व प्रकारच्या अटी स्पष्ट करण्यास सांगण्यात येतील. कॅशबॅकची रक्कम कंपनीच्या खात्यात राहील की, ग्राहकाच्या बँक खात्यात जाईल किंवा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड खात्यात वर्ग केली जाईल का? हे अशा कंपन्यांनी ग्राहकांना स्पष्ट करावे. ही रक्कम कंपनीच्या खात्यात राहणार असेल तर, त्या रकमेचा किता दिवसांत वापर करता येईल. ही रक्कम खर्च करण्यासाठी काही अटी असल्यास त्याही स्पष्ट करण्यास सांगण्यात येईल. एका ठिकाणी (विंडो) यासंदर्भातील स्पष्ट उल्लेख कंपन्यांना करावा लागणार आहे. नवीन निर्देशातहत ही विंडो आपोआप बंद वा खुली झाली पाहिजे. जेणेकरून स्वतंत्रपणे क्लिक करण्याची गरज पडू नये.आॅनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या कॅशबॅक आॅफरचा मुद्दा माहीत होत नाही. यासाठी एखादी समिती स्थापन करण्याबाबत विचारही झालेला नाही.