नवी दिल्ली : उरीतील लष्करी तळावरील हल्ल्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पाहणीतून काही उणिवा समोर आल्या. दोन गार्ड पोस्टमध्ये अजिबात समन्वय नव्हता, असे मतही या तपास एजन्सीने व्यक्त केले आहे. एनआयएने या प्रकरणाच्या दस्तऐवजांना अंतिम स्वरूप दिले आहे. पुरावे म्हणून घटनास्थळावरच्या वस्तूही हस्तगत करण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. याचा तपास करणाऱ्या एनआयएचे मत आहे की, ब्रिगेड मुख्यालयाच्या परिसरात अनेक भागांत जी तटबंदी आवश्यक असते, ती करण्यात आलेली नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली. उरीतील हल्ल्यासाठी त्या अतिरेक्यांनी पाकव्याप्त काश्मिरातून घुसखोरी केली असावी, असा अंदाजही तपास संस्थेने व्यक्त केला आहे. ही घुसखोरी १६ आणि १७ च्या मध्यरात्री ही घुसखोरी झाली असावी, असा संशय आहे. सुखदर येथे हे अतिरेकी थांबले असावेत. या ठिकाणी दाट झाडी आहे. अतिरेक्यांनी ही झाडे तोडून येथून पुढे प्रवेश मिळविला असावा, असा एनआयएचा प्राथमिक अंदाज आहे.दोन गार्ड पोस्टमध्येही समन्वय नसल्याचे यात म्हटले आहे. हे गार्ड पोस्ट एकमेकांपासून १५० फूट अंतरावर होते. उरीतील हल्ल्याच्या काळातील त्या २४ तासांतील सर्व कॉल डिटेल्स काश्मीर पोलीस जमा करीत आहेत. या कॉल डिटेल्सच्या माध्यमातून काही माहिती मिळते का ते तपासले जाणार आहे. अन्य तपशिलावरही तपास केला जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एनआयएच्या तपासात उरीतील उणिवा उघड
By admin | Published: September 24, 2016 5:45 AM