Lok Sabha Election Result ( Marathi News ) : देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला असून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र मागील दोन टर्ममध्ये स्वबळावर बहुमत मिळवणाऱ्या भाजपला यंदा मात्र २४० जागांवर रोखण्यात यश मिळवल्याने विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या गोटातही आनंदाचं वातावरण आहे. राम मंदिर, कलम ३७० हटवणे आणि पायभूत सुविधांबाबत झालेलं काम, या मुद्द्यांच्या आधारे आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि एनडीए ४०० जागांचा आकडा पार करेल, असा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "अब की बार, चारसो पार" अशी घोषणाही दिली होती. मात्र या घोषणेनंच भाजपचा घात केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
"देशात सत्तेत यायला तर २७२ जागा लागतात, पण भाजपला ४०० हून जास्त जागा हव्या आहेत, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे," असं निवडणूक काळात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांनी सांगायला सुरुवात केली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे तर प्रत्येक सभेत संविधानाची प्रत घेऊन जात लोकांना संविधान वाचवण्याचं आवाहन करत होते. तसंच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनीही हा मुद्दा प्रभावीपणे लोकांसमोर मांडून ही संविधान वाचवण्याची निवडणूक असल्याचं सांगितलं. त्यातच भाजपच्याही काही नेत्यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर संविधानात बदल करणार असल्याचं वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे हळहळू जनमाणसात विशेषत: दलित समाजात हा मुद्दा रुजल्याचं पाहायला मिळालं.
संविधान बदललं जाणार, या विरोधकांच्या प्रचाराचा भाजपला फटका बसणार असल्याचं निरीक्षण राजकीय जाणकार निवडणुकीदरम्यान नोंदवत होते. आता निवडणुकीनंतर एनडीएतील विविध नेत्यांनीही ही बाब मान्य केली आहे. निकालापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संविधानाचा मुद्दा लोकांच्या डोक्यातून काढता काढता आमच्या नाकी नऊ आल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या नरेटिव्हचा आम्हाला फटका बसल्याचं मान्य केलं आहे.
उत्तर प्रदेशची निवडणूक फिरली!
भाजप स्वबळावर बहुमत मिळवण्यास अपयशी ठरण्यास उत्तर प्रदेशात झालेली उलथापालथ प्रामुख्याने कारणीभूत ठरली आहे. मागच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात ६२ जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा मात्र केवळ ३३ जागांवर समाधान मानावं लागलं. उत्तर प्रदेशात दलित समाजाची संख्या लक्षणीय आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षापासून दुरावल्यानंतर दलित समाजाने उत्तर प्रदेशात भाजपला साथ दिली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावर हा समाज इंडिया आघाडीकडे वळल्याचं दिसत आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात विक्रमी ३७ जागा जिंकता आल्या असून काँग्रेसलाही ६ जागांवर यश मिळालं आहे.
दरम्यान, भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी जागा मिळण्यामध्ये ज्या काही गोष्टी कारणीभूत ठरल्या, त्यात भाजपपासून संविधानाला धोका आहे, या विरोधकांच्या प्रचाराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या 'अब की बार, चारसो पार' या घोषणेनंच भाजपचा घात केला की काय, अशी चर्चा आता रंगत आहे.