लखनौ - उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील कैराना येथील फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला असून, या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की त्यात चार जणांच्या चिंधड्या उडून घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या स्फोटामध्ये डझनभर लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Explosion at firecracker factory in Kairana, Uttar Pradesh, four people Death, several injured)
मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास फॅक्टरीमध्ये स्फोट झाला. हा स्फोट एवढा तीव्र होता की, तिथे असलेल्या लोकांना याचा जोरदार तडाखा बसला. त्यानंतर पोलीस आणि प्रशासनामधील लोक घटनास्थळी दाखल झाले. आता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
स्फोटाचा आवाज ऐकणाऱ्या लोकांनी सांगितले की, या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. तत्पूर्वी गेल्यावर्षी कांधला येथे फटाका फॅक्टरीमध्ये मोठी दुर्घटना घडली होती. तसेच याच्या आसपासही अनेक स्फोट झालेले आहेत. जिथे स्फोट झाला तिथे लोणच्याची फॅक्टरी होती. त्यामुळे तिथे अवैधपणे फटाके तयार केले जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच या फॅक्टरीमध्ये अनेक लोक काम करत होते. मात्र शुक्रवार असल्याने अनेकजण कामावर आले नव्हते. दरम्यान, स्फोटाची घटना घडल्यानंतर डीएम आणि एसपीही तात्काळ घटनास्थळी पोहोचले.