पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या कोळशाच्या खाणीत हा स्फोट झाला ती बीरभूम जिल्ह्यातील लोकपूर पोलीस स्टेशन परिसरात आहे.
गंगारामचक मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड कोलियरी (GMPL) असं या कंपनीचं नाव असून कोळसा क्रशिंग दरम्यान खाणीत भीषण स्फोट झाला. या घटनेत अनेक कर्मचारी जखमीही झाले आहेत.
कोळसा क्रशिंगसाठी कोळसा खाणीत ब्लास्टिंग करत असताना अनावधानाने हा दुर्घटना झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. स्फोट होताच घटनास्थळी G.M.P.L. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला.
स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून उर्वरित कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात येत आहे. तसेच भाजपाचे स्थानिक आमदारही घटनास्थळी आहेत. सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. पोलीस मृतांच्या कुटुंबीयांची माहिती गोळा करून त्यांच्याशी संपर्क साधत आहेत.