डेहराडून (उत्तराखंड) : उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर तो प्रतीकात्मक ठेवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली सूचना मान्य झाली, तरीही एप्रिल महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येला प्रशासनाला आवर घालता आलेला नाही. ही वाढ तब्बल १८०० टक्के वाढली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात कुंभमेळा कोरोनामुळे फक्त महिनाभरच ठेवण्यात आला होता. गेल्या महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तसेच मृत्यूही. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले त्यातील जवळपास निम्मे मृत्यू हे प्रतीकात्मक कुंभमेळा केला गेल्यानंतरचे. कुंभमेळ्यामुळेच राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढले का, अशी चर्चा सुरू आहे.१ एप्रिल ते ७ मे यादरम्यान राज्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढले. या ३७ दिवसांत रुग्णसंख्या एक लाख ३० हजारांनी वाढली. ही संख्यादेखील राज्याच्या एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास निम्मी आहे. उत्तराखंडमध्ये आतापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी १,७१३ मृत्यू हे १ एप्रिल ते ७ मेदरम्यानचे आहेत. या आठ दिवसांत राज्यात ८०६ मृत्यू झाले. फक्त एप्रिल महिन्यात उत्तराखंडमध्ये रुग्णसंख्या तब्बल १८०० टक्क्यांनी वाढली आहे.
रुग्णसंख्या २.२९ लाखउत्तराखंडमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या ७ मे रोजी नऊ हजार ६४२ इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २.२९ लाख झाली. कुंभमेळ्यातील शेवटचे शाहीस्नान आटोपताच उत्तराखंड सरकारने निर्बंधदेखील घातले आहेत.
दुसरी लाट कोणामुळे?- इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमित सिंह यांनी सांगितले की, ‘जानेवारीमध्ये आपण सगळ्यांनी आपले संरक्षण दूर करून गर्दी करणे, धार्मिक कार्यक्रम आखणे, लग्नसमारंभ करायला सुरुवात केली. - या गोष्टी टाळायला हव्या होत्या. कोरोना भारतीय प्रकाराचा प्रसार आधीच सुरू झाला आहे हे आपल्याला माहिती असतानाही वरील गोष्टी केल्या. उत्तराखंडमध्येदेखील हेच झाले.”