अलाहाबाद : कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असलेल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरात गुरुवारी रात्री स्फोटके असलेली एक प्लास्टिक बॅग आढळून आल्याने तिथे घबराट पसरली. बॉम्बनाशक पथकाने मात्र घटनास्थळावरून ही स्फोटके हस्तगत करून नष्ट केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, न्यायालयाच्या परिसरात मिळालेल्या बॅगमध्ये कमी तीव्रतेचे देशी बॉम्ब, फटाके आणि छर्रे होते. एखाद्या व्यक्तीने खोडी काढण्याच्या उद्देशाने ते येथे ठेवले असावेत. न्यायालयाच्या एका कर्मचाऱ्याने न्यायालय कक्ष क्र. ५५ जवळ एक बॅग बघितली आणि आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकारी संजय कुमार व वरिष्ठ पोलीस अधीक्षक शलभ माथुर यांच्या नेतृत्वातील अधिकाऱ्यांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. बॉम्बनाशक पथकही घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटकांना निकामी करण्यासाठी येथून दूर घेऊन जाण्यात आले. सुरक्षा यंंत्रणेतील ही मोठी त्रुटी असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. या ठिकाणी १५० पोलीस अधिकारी २४ तास तैनात असतात. परिसरात विविध जागी २१० सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. परिसरात केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची (सीआरपीएफ) ैएक तुकडीही कायमस्वरूपी तैनात असते. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले की, बॅगमध्ये दोन देशी बॉम्ब होते. ते नंतर नष्ट करण्यात आले. याशिवाय यात फटाके आणि छर्रेही होते. दिवाळीच्या निमित्ताने न्यायालय पाच दिवसांसाठी बंद असते. या पार्श्वभूमीवरच ही बॅग कोणीतरी चेष्टा म्हणून येथे ठेवली असावी. ही स्फोटके फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्थात, प्राथमिक तपासणीनुसार हे बॉम्ब अतिशय कमी क्षमतेचे असल्याचे सांगितले जात आहे. (वृत्तसंस्था)सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीचा परिणामसुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी वा दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी मान्य केले. या प्रकारानंतर न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्फोटके कमी तीव्रतेची आहेत, हे खरे असले तरी ती न्यायालयाच्या परिसरात ती येणे, हा गंभीर प्रकार आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
न्यायालय परिसरात स्फोटकांची बॅग
By admin | Published: October 29, 2016 2:31 AM