नवी दिल्ली : निर्यातदारांना येत्या नोव्हेंबरअखेर वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) थकीत परतावा मिळेल व येत्या सहा महिन्यांत निर्यातीवर कोणताही कर लागू केला जाणार नाही, असे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी स्पष्ट केले.जुलै व आॅगस्टमध्ये एकात्मिक जीएसटीचे अंदाजे ६७ हजार कोटी जमले. त्यातील केवळ पाच ते दहा हजार कोटीच निर्यातदारांना परताव्याचे द्यायचे आहेत, असे अढिया येथे म्हणाले. चालू आर्थिक वर्षाच्या राहिलेल्या महिन्यांत निर्यात होणाºया वस्तुंवर कोणताही कर द्यावा लागणार नाही. १ एप्रिलपासून ई-वॉलेट सेवा सुरू होत असून, ती निर्यातदारांना प्रतीकात्मक (नोशनल) पत उपलब्ध करून देईल व त्याचा वापर जीएसटी अदा करायला होईल, असे ते म्हणाले.वॉलेटमधील क्रेडिट हे हस्तांतरणीय असेल. डझनभर अप्रत्यक्ष कर आणि अबकारी व व्हॅट कर एकत्र करून जीएसटी तयार केला गेला आहे. मात्र, त्यात कोणाला सूट दिलेली नाही, त्यामुळे निर्यातदारांना आधी उत्पादित मालावर एकात्मिक जीएसटी भरावा लागतो व निर्यातीनंतर त्याच्या परताव्याचा दावा करावा लागतो. यामुळे रोख पैशांची प्रचंड टंचाई निर्माण होते.
निर्यातदारांना नोव्हेंबरअखेर परतावा, येत्या सहा महिन्यांत निर्यातीवर कोणताही कर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:32 AM