भारतीयांना युद्धात ढकलणाऱ्यांचा पर्दाफाश; रशियातील २ एजंट सीबीआयकडून उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 01:53 PM2024-03-09T13:53:54+5:302024-03-09T13:54:10+5:30
याप्रकरणी सीबीआय रशियास्थित २ एजंटची माहिती गोळा करत आहे.
नवी दिल्ली : मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. ही टोळी भारतीयांना युक्रेनच्या युद्धात ढकलत होती. या एजंटांनी रशियात येणाऱ्या भारतीयांचे पासपोर्ट जमा करून घेतले आणि नंतर त्यांना युद्धात लढण्यास भाग पाडले. याप्रकरणी सीबीआय रशियास्थित २ एजंटची माहिती गोळा करत आहे.
राजस्थानचे रहिवासी असलेले क्रिस्टीना आणि मोईनुद्दीन चिप्पा हे दोघे रशियात आहेत आणि ते भारतीय तरुणांना तेथे किफायतशीर नोकरीच्या संधी देऊन रशियात तस्करी करण्यास मदत करत होते. १७ इतर व्हिसा सल्लागार कंपन्या, त्यांचे मालक आणि भारतभर पसरलेल्या एजंटची यादी जाहीर करण्यात आली आहे.
नेमके कसे फसवले?
एजंटांनी विद्यार्थ्यांना सरकारी किंवा सार्वजनिक विद्यापीठांऐवजी रशियातील संशयास्पद खासगी विद्यापीठांमध्ये सवलतीचे शुल्क आणि व्हिसा वाढवून देऊन फसवले. एकदा हे इच्छुक रशियाला पोहोचल्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त केले आणि त्यांना युद्धात सामील होण्यास भाग पाडले. सीबीआयला अशी ३५ उदाहरणे सापडली आहेत.
भारत सरकार म्हणते...
रशियाच्या सैन्यासोबत काम करण्यासाठी अनेक भारतीय नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे आणि भारताने त्यांच्या लवकर सुटकेसाठी हे प्रकरण रशियाकडे लावून धरले आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले.