नवी दिल्ली : घरातील वापरापासून ते विद्युत रोषणाई आणि इतर अनेक ठिकाणी एलईडी लाइटचा वापर वाढला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी एलईडी लाइटसच्या संपर्कात आल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.चीनमधील शांघाय जिओटॉन्ग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांना मधुमेहाचा वाढता धोका आणि रात्रीची लाइट यांच्यातील परस्परसंबंध आढळला आहे. त्यांना असे आढळले की रात्रीच्या प्रकाशाच्या तीव्र संपर्कामुळे मेलाटोनिन आणि कॉर्टिकोस्टेरॉन सारख्या हार्मोन्सच्या प्रोफाइलमध्ये बदल होऊ शकतो.
शरीराचा असा उडतो गोंधळ- जेव्हा अंधार पडू लागतो, तेव्हा आपले मेलाटोनिनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे आपल्याला झोप येते. तुमची साखरेची पातळी तुमच्या जागृत होण्याच्या संप्रेरकांसोबत वाढते. - तेजस्वी दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी शरीरात मेलाटोनिन सोडायचे की दाबायचे याबद्दल गोंधळ होतो, असे डॉ. मोहन यांनी सांगितले. - मेलाटोनिनला दडपून टाकल्यामुळे शरीर जागृत आणि सतर्कतेच्या स्थितीत राहते. यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता निर्माण होते आणि काउंटर रेग्युलेटरी हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे शरीरावर ताण येतो.
या कर्मचाऱ्यांना धोका जास्तरात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना लाइटमध्ये काम करावे लागते. हा गट जीवनशैलीबाबत कमी शिस्तबद्ध असतो. त्यांना कमी झोप मिळते. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणा यांचा त्रास होऊ शकतो. मधुमेह आणि जुनाट आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी झोप महत्वाची आहे. उशिरा झोपणाऱ्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक आणि मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.