नऊ मंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची हकालपट्टी; राष्ट्रीय कार्यकारिणीत शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 06:02 AM2023-07-07T06:02:25+5:302023-07-07T06:02:42+5:30

शरद पवारांवर विश्वास

Expulsion of Praful Patel, Sunil Tatkare along with nine ministers; Sealing in the National Executive | नऊ मंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची हकालपट्टी; राष्ट्रीय कार्यकारिणीत शिक्कामोर्तब

नऊ मंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची हकालपट्टी; राष्ट्रीय कार्यकारिणीत शिक्कामोर्तब

googlenewsNext

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणारे नऊ आमदार तसेच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यासह एस. आर. कोहली यांची हकालपट्टी करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करणारा ठराव बैठकीत पारित करण्यात आला. 

अजित पवार यांचा दावा फेटाळला
राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बेकायदा असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा शरद पवार यांनी फेटाळून लावला. ही बैठक पक्षाच्या घटनेनुसार झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचा मी अध्यक्ष आहे, एवढेच मला माहिती आहे. माझे वय ८२ असो वा ९२ असो. त्याचा फार फरक पडत नाही. वेळ आल्यावर कोणाच्या मागे किती आमदार आहेत, ते स्पष्ट होईल, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या ६, जनपथ निवासस्थानी गुरुवारी बैठक पार पडली. बैठकीला पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह २३ पैकी १८ सदस्य उपस्थित होते. बैठकीत ८ ठराव पारित करण्यात आले. २७ राज्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा शरद पवारांसोबत आहेत. महाराष्ट्रातील आमदार म्हणजे पक्ष नव्हे, असे पी. सी. चाको यांनी स्पष्ट केले. 

आमदार नव्हे, पक्ष महत्त्वाचा
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात आमदार महत्त्वाचे नसून राजकीय पक्ष महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे. तिथे आम्ही आमची बाजू मांडू. कोणापाशी किती आमदार आहेत, ते निवडणूक आयोग ठरवेल, पण तिथे कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून अनपेक्षित निकाल लागल्यास, दुसऱ्या व्यासपीठावर न्याय मागण्याचा विचार करू, पण तशी वेळ येईल, असे आपल्याला वाटत नाही.

तपास संस्था इतक्या प्रभावी होत्या हे ठाऊक नव्हते...
पटेल, भुजबळ आणि तटकरे यांना पदे दिल्यावरही ते पक्ष सोडून जातील, याची कल्पना नव्हती का, असे विचारले असता देशातील तपास संस्था किती प्रभावी आहेत, हे आपल्याला ठाऊक नव्हते, हे मान्यच करावे लागेल, असे ते उपरोधिकपणे म्हणाले. ईडी, सीबीआय आणि इतर संस्थांच्या दबावामुळे देशातील किती पक्ष फुटणार हे आपल्याला ठाऊक नाही, पण केंद्रातील भाजप सरकार विरोधी पक्षांवर दबाव आणण्यासाठी या संस्थांचा ठिकठिकाणी वापर करीत आहे, असे ते म्हणाले.

उद्यापासून महाराष्ट्र दौरा
शरद पवार शनिवारपासून महाराष्ट्र दौरा करणार असून त्याची सुरुवात नाशिकपासून होत आहे. नाशिकपाठोपाठ मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव, चाळीसगाव आणि भुसावळ असा ८ ते १० जुलैपर्यंतचा त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आहे. त्यानंतर मुंबईला परत येऊन ते अहमदनगरचा दौरा करणार आहेत.  

त्यासाठी ५ दिवस कशाला? 
अजित पवारांच्या गटाने ३० जूनला केलेली याचिका निवडणूक आयोगाकडे ५ जुलैला पोहोचली. त्यावर पवार म्हणाले, देशात महत्त्वाची कागदपत्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला पाच दिवस लागतात, हे आपल्याला ठाऊक नाही, पण त्याविषयी निवडणूक आयोग निर्णय घेईल, असे ते म्हणाले. 

नव्याने पक्षबांधणी करणार
महाराष्ट्रात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटीमुळे दुबळा झाल्याने देशव्यापी विरोधी ऐक्यावर त्याचा काय परिणाम होईल, असे विचारले असता आम्ही नव्याने पक्षबांधणी करू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. आजची बैठक आमचा उत्साह वाढविणारी ठरली, असे ते म्हणाले. 

शिंदेंना हटविणार का? 
मुख्यमंत्रिपदावरून शिंदे यांना हटविले जाण्याची मला माहिती नाही. तुम्हाला असेल तर मला सांगा, असे पवार यांनी मिश्कीलपणे पत्रकारांना विचारले. कुणाला पंतप्रधान व्हायचे असेल किंवा कुणाला मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर त्याच्याशी आपल्याला घेणे-देणे नाही, असेही ते म्हणाले. 

राज-उद्धव ठाकरेंबाबत...
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे, असे ते म्हणाले.  

Web Title: Expulsion of Praful Patel, Sunil Tatkare along with nine ministers; Sealing in the National Executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.