सचिन पायलट यांची हकालपट्टी, प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतले, भाजपने दिले निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 05:11 AM2020-07-15T05:11:21+5:302020-07-15T06:09:47+5:30

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरूद्ध बंडाचा झेंडा उभारल्याबद्दल विश्वेंद्र सिंग व रमेण मीणा यांनाही मंत्रिपदावरून दूर करण्यात आले. काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीस हे नेते गैरहजर राहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

Expulsion of Sachin Pilot, removal of state president, invitation given by BJP | सचिन पायलट यांची हकालपट्टी, प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतले, भाजपने दिले निमंत्रण

सचिन पायलट यांची हकालपट्टी, प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतले, भाजपने दिले निमंत्रण

Next

जयपूर/नवी दिल्ली : राजस्थानमधील बंडखोर नेते सचिन पायलट यांची काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद व प्रदेशाध्यक्षपदावरून मंगळवारी हकालपट्टी करताच भाजप नेत्यांनी त्यांना आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. बहुसंख्य आमदारांचा गेहलोत यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट होताच काँग्रेसने हा निर्णय जाहीर केला.
सचिन पायलट हे सतत भाजपच्या संपर्कात होते आणि गेहलोत सरकार पडण्याची त्यांनी तयारी चालवली होती, अशी ध्वनिफीत पाहिल्यानंतर सोमवारी रात्रीच त्यांना उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष या पदांवरून दूर करण्याच्या सूचना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिल्या होत्या, असे खात्रीलायकरीत्या समजते. मात्र, मुख्यमंत्री गेहलोत यांच्यामागे पक्षाचे व अपक्ष आमदार असे बहुसंख्य आमदार असल्याचे आज सकाळच्या बैठकीत निश्चित झाल्यावर तशी घोषणा करण्यात आली. सचिन पायलट यांच्यामागे काँग्रेस व काही अपक्ष असे १७ ते १८ आमदारच असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पायलट यांना किमान ३० आमदारांचा पाठिंबा आहे, असे त्यांचे समर्थक आणि भाजप नेते सांगत आहेत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरूद्ध बंडाचा झेंडा उभारल्याबद्दल विश्वेंद्र सिंग व रमेण मीणा यांनाही मंत्रिपदावरून दूर करण्यात आले. काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीस हे नेते गैरहजर राहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
मागील दोन दिवसांत आज विधिमंडळ पक्षाची बैठक दुसऱ्यांदा घेण्यात आली. पायलट यांना पक्षाच्या झेंड्याखाली येण्याची ही दुसरी संधी होती. पण आज व काल अशा दोन्ही बैठकांना ते गेले नाहीत. पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी पायलट यांना पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करण्याची दिलेली संधी त्यांनी नाकारल्याने आणि पक्ष नेतृत्व तसेच गेहलोत यांना आव्हान दिल्याने नाईलाजाने हा निर्णय घेतला, असे पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.

काँगे्रेस नेत्यांकडून संपर्क करण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांत पायलट यांच्याशी राहुल गांधी यांचे एकदा, तर प्रियांका गांधी यांचे चारदा फोनवर बोलणे झाले. वेणुगोपाल तीन वेळा, पी. चिदंबरम सहा वेळा आणि अहमद पटेल तब्बल १५ वेळा पायलट यांच्याशी बोलले. पण गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवा आणि मला ते पद द्या, असा पायलट यांचा आग्रह होता, असे सूत्रांनी सांगितले.

सत्य परेशान हो सकता
है, पराभूत नही - पायलट
उपमुख्यमंत्रीपद व प्रदेशाध्यक्षपद गेल्यानंतर सचिन पायलट आता पुढे काय करणार, हे सध्या तरी स्पष्ट नाही. मात्र, ते भाजपमध्ये जाणार नाहीत. राजस्थानमध्ये नेतृत्वबदल व्हावा, हे त्यांचे ध्येय होते, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. सत्य परेशान हो सकता है, पराभूत नही, असे टिष्ट्वट त्यांनी केले आहे.

नाईलाजाने केली कारवाई - गेहलोत
सचिन पायलट हे भाजपच्या हातचे खेळणे झाले. त्यांची भाजपने दिशाभूल केली. त्यामुळे राज्यात घोडेबाजार सुरू झाला. पायलट यांच्यावर नाईलाजाने कारवाई करण्यात आली, असे मुख्यमंत्री गेहलोत
म्हणाले.

Web Title: Expulsion of Sachin Pilot, removal of state president, invitation given by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.