नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन एक आठवडा वाढविण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिल्लीत गेल्या १९ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, हा लॉकडाऊन उद्या १० मे रोजी संपणार आहे. परंतू दिल्लीतील कोरोना स्थिती पाहता हा लॉकडाऊन आणखी एक आठवडा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात येणार आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच, लॉकडाऊनचा परिणाम चांगल दिसून येत आहे. २६ एप्रिलनंतर कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना संक्रमणाचा दर ३० टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले.
याचबरोबर, दिल्लीत ऑक्सिजन पुरवठ्याची सर्वात मोठी अडचण निर्माण होत आहे. इतर दिवसांच्या तुलनेत सध्या रुग्णालयांमध्ये अनेक पटीने ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. कारण, आतापर्यंत जितके रुग्ण येत आहेत, त्या सर्वांना ऑक्सिजनची गरज भासत आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
दरम्यान, राजधानी दिल्लीत शनिवारी १७ हजार ३६४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. करोनामुळे ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १९ हजारांच्या पार गेला आहे. सध्या दिल्लीत ८७ हजार ९०७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
(पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा का हरले?, 'रोखठोक'मधून संजय राऊतांनी सांगितलं कारण)
देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णगेले काही दिवस २४ तासांतील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत देशभरातून ३ लाख ८६ हजार ४४४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत देशात १ कोटी ८३ लाख १७ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी २२ लाख ९६ हजार ४१४ वर गेला आहे. आतापर्यंत २ लाख ४२ हजार ३६२ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ३७ लाख ३६ हजार ६४८ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.