नवी दिल्ली : सेवाकराचे विवरणपत्र भरण्याची मुदत सरकारने पाच दिवसांनी वाढवून ३0 एप्रिल केली आहे. या निर्णयामुळे लाखो सेवाकर दात्यांना दिलासा मिळणार आहे.अप्रत्यक्ष कर विभागाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. निवेदनात म्हटले आहे की, १ आॅक्टोबर ते ३१ मार्च या काळातील सेवाकराचे एसटी-३ विवरणपत्र भरण्याची मुदत आधी २५ एप्रिल २0१७ पर्यंत होती. ती आता वाढवून ३0 एप्रिल २0१७ करण्यात आली आहे. प्रत्येक नोंदणीकृत सेवाकर दात्यास दर सहा महिन्यांनी एसटी-३ हे विवरणपत्र नियोजित तारखेच्या आत भरावे लागते. तारखेनंतर विवरणपत्र भरल्यास दंड आकारला जातो. एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीसाठी विवरणपत्र भरण्याची मुदत २५ आॅक्टोबर आणि आॅक्टोबर ते मार्च या सहामाहीसाठी २५ एप्रिल आहे. हे विवरणपत्र आॅनलाईन भरावे लागते. सेवाकराचे विवरणपत्र दर सहा महिन्यांनी भरावे लागत असले तरी कर मात्र दर महिन्याला अथवा दर तीन महिन्यांनी भरावा लागतो. केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क बोर्डाने म्हटले की, एसीईएसच्या वेबसाईटमध्ये २५ एप्रिल रोजी वारंवार बिघाड येत होता. त्यामुळे विवरणपत्र दाखल करण्यात अडथळे निर्माण झाले. त्याची भरपाई म्हणून विवरणपत्र भरण्याची मुदत पाच दिवसांनी वाढविण्यात येत आहे.करतज्ज्ञांच्या मते सध्या केवळ सेवाकराची व्यवस्थाच आॅनलाईन आहे. तिचा भार पेलण्यास सरकारी यंत्रणा असमर्थ ठरत आहे. वस्तू व सेवाकरव्यवस्थेत व्यापारी आणि उत्पादकांनाही कराशी संबंधित सर्व व्यवहार आॅनलाईन करावे लागणार आहेत. हे सगळे व्यवहार जीएसटीएन पोर्टल कसे पेलू शकेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
सेवाकर विवरणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
By admin | Published: April 28, 2017 1:30 AM