ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - ललित मोदीप्रकरणात विरोधकांनी सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली असताना खुद्द सुषमा स्वराज यांनी पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाऊंटवरील बायोडाटामधून 'पररराष्ट्र मंत्री' हा उल्लेख काढून टाकल्याने आश्चर्यं व्यक्त होत आहे.
ललित मोदींना ट्रॅव्हल डॉक्यूमेट काढून देण्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केली होती. तसेच स्वराज कुटुंबीय व ललित मोदींच्या व्यावसायिक संबंधही उघड झाल्याने सुषमा स्वराज अडचणीत आल्या आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधी पक्षांनी सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. पक्षश्रेष्ठींनी सुषमा स्वराज यांची पाठराखण केली असली तरी सुषमा स्वराज यांनी पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या एक आठवड्यापूर्वीच ट्विटर अकाऊंटवरुन परराष्ट्र मंत्री हा उल्लेख काढून टाकला आहे. सुषमा स्वराज यांनी हा उल्लेख का काढला या विषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.