S. Jaishankar: देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीन यांच्यावर जोरदार शब्दांत निशाणा साधला. एका कार्यक्रमात बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानातील दहशतवाद आणि चीन सीमेवर झालेल्या झटापटीला जोरदार प्रत्युत्तर भारताने दिले. यावरून भारत आता कोणाच्या दबावात न येता, आपल्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वकाही करू शकतो, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
भारत असा देश आहे जो कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. आपल्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. १९४७ साली फाळणी झाली नसती तर चीन नव्हे तर भारत हा जगातील सर्वांत मोठा देश झाला असता. फाळणीमुळे देशातील अनेक प्रदेश वेगळे झाले, असे जयशंकर यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री म्हणून अन्य देशांमध्ये गेल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवले की, कोरोना काळातील देशाच्या कामगिरीची जगाने दखल घेतली आहे, असे जयशंकर यांनी नमूद केले आहे.
जागतिक दृष्टीकोनातूनही भारत देश महत्त्वाचा
जयशंकर पुढे म्हणाले की, अन्य देशातील माझ्या समकक्षांनी सांगितले की, त्यांच्या काही समस्या आहेत, ज्यावर पंतप्रधान मोदी तंत्रज्ञानाद्वारे तोडगा काढू शकतात, असा त्यांना विश्वास आहे. जागतिक दृष्टीकोनातूनही भारत देश महत्त्वाचा आहे. कारण प्रादेशिक संकटाला प्रतिसाद देणारा देश नेहमीच पहिला असतो. जागतिक सुरक्षेतही भारताला महत्त्व आहे, असे जयशंकर यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"