नवी दिल्ली: लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असेल, असं महत्त्वपूर्ण विधान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केलं आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच हिस्सा आहे आणि लवकरच तो भौगोलिकदृष्ट्या भारतात असेल, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या पुढील धोरणांचे संकेत दिले. मोदी सरकार-२ ला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्या निमित्तानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीरसह कलम ३७० सह आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताच्या भूमिकेवरदेखील भाष्य केलं. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल विधानं केली आहेत. कलम ३७० नंतर आता पीओके सरकारच्या अजेंड्यावर असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं होतं. यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीदेखील सिंह यांचीच री ओढली. कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. पाकिस्तानचा कलम ३७०शी काहीही संबंध नाही. पाकिस्तानचा संबंध दहशतवादाशी आहे, असं जयशंकर यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटलं. काश्मीर आणि कलम ३७० चा मुद्दा वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेणाऱ्या पाकिस्तानलादेखील जयशंकर यांनी टोला लगावला. कलम ३७० हा पूर्णपणे अंतर्गत मुद्दा आहे. आंततराष्ट्रीय समुदायाला या विषयाची कल्पना आहे, असं जयशंकर म्हणाले. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रात कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र इतर देशांनी पाठिंबा न दिल्यानं पाकिस्तान तोंडावर आपटला होता. जयशंकर यांनी सार्कबद्दल बोलतानाही पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली. सार्क दक्षिण आशियातील देशांची संघटना आहे. तिचा संबंध व्यापार, दळणवळणाशी आहे. या गोष्टींमधील सहकार्यासाठी दहशतवादाची आवश्यकता नाही. कोणता देश सार्कला पुढे नेतोय आणि कोणता देश दहशतवादाला प्रोत्साहन देतोय, याचा विचार सार्क देशांनी करावा, असं जयशंकर यांनी म्हटलं.