नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांच्या जागी परराष्ट्र मंत्री म्हणून आलेले एस जयशंकर यांनी आज भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जयशंकर यांना गुजरातमधून राज्यसभेचे तिकीट देण्यात आले आहे.
एस जयशंकर यांना 30 मे रोजी शपथ देण्यात आली होती. भाजपाच्या केंद्रीय निवड समितीने गुजरातमधून राज्यसभेसाठी उमेदवार बनविले आहे. शपथ घेतल्याच्या सहा महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही पैकी एका सदनाचा सदस्य बनने गरजेचे असते. जयशंकर यांच्याबरोबर गुजरातमधून दुसऱ्या जागेवर जुगल माथुर ठाकोर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कोण आहेत जयशंकरएस जयशंकर हे 1977 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. सतत कुरघोड्या करणाऱ्या चीन सोबत संबंध सुधारणे आणि अमेरिकेसोबतचे संबंध मजबूत करण्यामध्ये यांची महत्वाची भुमिका आहे. डोकलाम विवादावेळीही जयशंकर यांची मध्यस्थी कामी आली होती. 2012 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी चीनला गेले होते, तेव्हा त्यांची भेट झाली होती. जयशंकर हे अनेक देशांसोबतच्या कूटनीतीमध्ये हिस्सा झालेले आहेत.