ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप असलेल्या विजय मल्ल्याचे पासपोर्ट अखेर परराष्ट्र मंत्रालयाने रद्द केले आहे. विजय मल्ल्याने जी उत्तरे दिली त्यावर विचारविनिमय करुन पासपोर्ट कायदा कलम १०(३) अंतर्गत मल्ल्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त विकास स्वरुप यांनी टि्वटरवरुन दिली.
मागच्या महिन्याभरापासून ब्रिटनमध्ये असलेल्या मल्ल्यावर विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु आहे.
मल्ल्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते. मल्ल्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आले आहे.